जनजागृती : टाकवे, घोणशेतमध्ये शेतकऱ्यांना धडे
उत्पन्न वाढीचा फंडा : “उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ मोहिमेला गती
टाकवे बुद्रुक – कृषी विभागामार्फत मावळ तालुक्यातील विविध भागात “उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या मोहिमेत सुरवात करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांचे शेती उत्पादन येत्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने ही मोहीम मुख्यत्वे राबविण्यात येत आहे.
अभियान, मोहिमांच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात जनजागृती करुन शेती क्षेत्राशी संबंधित सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पिकांची उत्पादकता आणि अनुवंशिक उत्पादन क्षमतेतील तफावत करुन शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणे. पीक विमा योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करुन घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे हे प्रमुख उद्दिष्ट “उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानाचे आहे. टाकवे बुद्रुक व घोणशेत या ठिकाणी या मोहिमेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. या वेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी सहाय्यक अधिकारी ए. के. वरवडे आणि एस. के. घावट यांच्या उपस्थित ही शेतीशाळा घेण्यात आली.