पश्‍चिमेला पेरण्यांना वेग; पूर्वेचा भाग कोरडा

सम्राट गायकवाड
उसाची 7 टक्के लागवड

कृषी विभागाने जिल्ह्यात 61 हजार 93 हेक्‍टरवर ऊस लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी केवळ 4 हजार 305 हेक्‍टरवर लागवड झाली आहे. त्यामध्ये कराड तालुक्‍यात 18 हजार 539 हेक्‍टरपैकी 3 हजार 746, कोरेगाव तालुक्‍यात 10 हजार 27 पैकी केवळ 92 तर सातारा तालुक्‍यात 8 हजार 918 पैकी केवळ 450 आणि वाई तालुक्‍यात 4 हजार 857 पैकी 18 हेक्‍टरवर लागवड करण्यात आली आहे.

सातारा – जुलै महिन्याच्या मध्यावर जिल्ह्याच्या पश्‍चिमेला खरिपाच्या पेरण्यांचा वेग वाढला आहे. पश्‍चिमेच्या तालुक्‍यांमध्ये सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड ज्वारीची सर्वाधिक पेरणी होताना दिसत आहे. तर पूर्वेच्या माण, खटाव, खंडाळा आणि फलटण तालुक्‍यांत आत्तापर्यंत शून्य टक्के पेरणी झाली आहे. दि. 9 जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात अन्नधान्याची 21.42 टक्के तर ऊस वगळून गळीतधान्याची 29.52 टक्के पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात ऊस वगळता गळीतधान्याची 2 लाख 90 हजार 983 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्‍चित केले आहे. त्यापैकी अत्तापर्यंत 85 हजार 902 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरणी सोयाबीनची 50 टक्केपर्यंत झाली आहे. तालुका निहाय मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्‍यात सोयाबीनची अपेक्षित 15 हजार 767 हेक्‍टरपैकी 7 हजार 337, जावली तालुक्‍यात 2 हजार 332 हेक्‍टरपैकी 1 हजार 679, पाटण तालुक्‍यात 7 हजार 122 हेक्‍टरपैकी 6 हजार 409, कराड तालुक्‍यात 14 हजार 237 हेक्‍टरपैकी 6 हजार 518, कोरेगाव तालुक्‍यात 6 हजार 261 हेक्‍टरपैकी 3 हजार 633 आणि वाई तालुक्‍यात 4 हजार 056 हेक्‍टरपैकी 1 हजार 367 हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

त्यापाठोपाठ जिल्ह्यात भुईमुगाची अपेक्षित 40 हजार 430 हेक्‍टरपैकी 16 हजार 862 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक पेरणी पाटण तालुक्‍यात झाली आहे. पाटण तालुक्‍यात अपेक्षित 17 हजार 568 हेक्‍टरपैकी 12 हजार 34 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ कराड तालुक्‍यात 9 हजार 558 हेक्‍टरपैकी 3 हजार 389, वाई तालुक्‍यात 1 हजार 717 हेक्‍टरपैकी 519, जावली तालुक्‍यात 2 हजार 974 हेक्‍टरपैकी 838 तर सर्वात कमी सातारा तालुक्‍यात 7 हजार 481 हेक्‍टरपैकी केवळ 82 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. उर्वरित तालुक्‍यांमध्ये अद्याप भुईमूगाची पेरणी होवू शकलेली नाही. तर कारळ्याची आत्तापर्यंत जिल्ह्यात अपेक्षित 953 हेक्‍टरपैकी पाटण, कराड आणि वाई तालुक्‍यात एकूण 294 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सुर्यफुलाची अपेक्षित 581 हेक्‍टरपैकी पाटण, कराड आणि वाई तालुक्‍यात एकूण केवळ 38 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तीळाची अपेक्षित 62 हेक्‍टरपैकी पाटण आणि वाई तालुक्‍यात एकूण 23 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

अन्नधान्याच्या जिल्ह्यात 1 लाख 94 हजार 876 हेक्‍टर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्‍चित केले आहे. त्यापैकी केवळ 41 हजार 743 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली असून अपेक्षित 26 हजार 945 हेक्‍टरपैकी 11 हजार 137 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पेरणीमध्ये पाटण तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. पाटण तालुक्‍यात 9 हजार 38 हेक्‍टरपैकी 7 हजार 167 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ कराड तालुक्‍यात 8 हजार 866 हेक्‍टरपैकी 3 हजार 372 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे तर सातारा तालुक्‍यात सर्वात कमी म्हणजे 5 हजार 201 हेक्‍टरपैकी केवळ 210 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

वाई आणि जावली तालुक्‍यात देखील अद्याप ज्वारी पेरणीला म्हणावा असा वेग येताना दिसून येत नाही. दरम्यान, भात लागणीसाठी जिल्ह्यात 50 हजार 805 हेक्‍टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 17 हजार 905 हेक्‍टरवर भात लागण झाली आहे. त्यामध्ये पाटण तालुक्‍यात 18 हजार 451 हेक्‍टरपैकी 11 हजार 775 हेक्‍टरवर भात लागण झाली आहे. त्यापाठोपाठ कराड तालुक्‍यात 8 हजार 977 हेक्‍टरपैकी 3 हजार 655 तर उर्वरित सातारा तालुक्‍यात 950, जावली तालुक्‍यात 802, वाई तालुक्‍यात 323, महाबळेश्‍वर तालुक्‍यात 400 हेक्‍टरवर धिम्या गतीने लागण होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.