नगर – संविधानाच्या माध्यमातून देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखले गेले आहे. लोकशाही व्यवस्थेतून एक भारत श्रेष्ठ भारत’ ही प्रतिमा जगात निर्माण करण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानातून आपल्याला लोकशाही व्यवस्थेची मूल्य मिळाली. यामुळे प्रत्येक नागरीकांना विचारांचे स्वातंत्र्य मिळाल्याने लोकशाहीची व्यवस्था अधिक भक्कम झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी परेडचे निरिक्षण केले. परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलिस दल, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, वैद्यकीय पथक यांच्यासह विविध चित्ररथांचा समावेश होता. रेसिडेन्सिअल हायस्कुल, चक्रधर स्वामी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडगाव, रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कुल, भाऊसाहेब फिरोदीया हायस्कुल या शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांवर सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरीक यावेळी उपस्थित होते.