मुबई – मार्च ३० हा दिवस भारतीय बॉक्स ऑफिससाठी खूप खास ठरला आहे. एकीकडे अभिनेता अजय देवगणचा भोला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर दुसरीकडे साऊथचा दसरा हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या तेलगू चित्रपटात टॉलिवूड स्टार नानी मुख्य भूमिकेत आहे. त्याचे चाहते अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. प्रदर्शित होताच दसरा या चित्रपटाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
कमाईच्या बाबतीत दसरा अजय देवगनच्या भोलावर वरचढ ठरताना दिसत आहे. दसरा हा चित्रपट तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने तेलगू भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दसरा चित्रपटाचे जास्तीत जास्त शो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये सुरू आहेत. येथील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहाटे पाच वाजल्यापासूनच पहिला शो सुरू करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
पहिल्याच दिवशी दसराने जवळपास 17 कोटींचा व्यवसाय केला आहे. भोलाला मात्र पहिल्या दिवशी अकरा कोटींपर्यंतच मजल मारता आल्याचे समोर आले. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा साऊथ सिनेमा बॉलिवूडवर वरचढ ठरत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दसरा चित्रपटात नानीसोबत अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि धिकक्षित शेट्टी, समुथिराकनी आणि शाइन टॉम चाको हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दसरा या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत उडेला यांनी केले आहे.
नानीने याआधी अनेक चित्रपट केले आहेत, ज्याद्वारे तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळवले आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला अष्ट चम्मा हा त्याचा पहिला चित्रपट होता. राजामौली यांच्या मक्खी चित्रपटाने त्याला घराघरात पोहचवले होते.