सेऊल : दक्षिण कोरियात अध्यक्ष यून सुक येओल यांच्यावर महाभियोग चालवण्यात यावा या संसदेत मांडलेल्या ठरावावरील मतदानावर सत्तारुढ पीपल्स पॉवर पार्टीने बहिष्कार घातल्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला नाही. मतदान सुरू असलेल्या कक्षात खासदारांनी प्रवेशच करू नये, यासाठी पीपीपीच्या खासदारांनी वाट अडवून ठेवली होती. त्यामुळे विरोधक आणि सतत्तारुढ पक्षाच्या खासदारांमध्ये संसदेतच बाचाबाची झाली.
हा ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताने मंजूर होणे गरजेचे होते. संसदेतील ३०० सदस्यांपैकी २०० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तरच महाभियोगाचा ठराव मंजूर होऊ शकला असता. मात्र त्यासाठी विरोधकांना ८ मते कमी पडत होती. मात्र मार्शल लॉ उठवण्याच्या ठरावाच्यावेळी सत्तारुढ पीपल्स पॉवर पार्टीच्या १८ सदस्यांनी विरोधकांच्या बाजूने मतदान केले होते. तेच सदस्य महाभियोगाच्या ठरावाच्याही बाजूने मतदान करतील, अशी विरोधकांची आशा होती.
प्रत्यक्ष्यात सत्तारुढ पक्षानेच या ठरावावरील मतदानावर बहिष्कार घातल्यामुळे ठराव आपोआपच फेटाळला गेला. संसदेचे सभापती वू वोन शिक यांनी हा ठराव फेटाळला जाण्याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे. ही घटना देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संसदेचे पुढील अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. तेंव्हा विरोधक महाभियोगाचा नवीन प्रस्ताव मांडू शकतात.
मात्र तेंव्हाही चित्र काही वेगळे असेल, असे सांगता येऊ शकणार नाही. यून यांच्याविरोधात महाभियोगाची मागणी करणारा ठराव फेटाळला गेल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांकडून यून यांच्याविरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले जाण्याची शक्यता आहे. आज राजधानी सेऊलमध्ये यून यांच्या निषेधासाठी विराट मोर्चा काढण्यात आला होता.