जोहान्सबर्ग- निझामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभाला उपस्थित राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एका धर्मगुरुचा करोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाअला आहे. या धर्मगुरुच्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती दिली आहे. मौलाना युसुफ तुतला (वय 80) असे या धर्मगुरुचे नाव आहे. गेल्या महिन्यात 1 ते 15 मार्च दरम्यान निझामुद्दीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी धार्मिक समारंभाला ते उपस्थित राहिले होते. या धार्मिक समारंभाला देशातील वेगवेगळ्या भागातून आणि विदेशातून येऊन उपस्थित राहिलेले अनेकजणांना करोना विषाणूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तुतला यांचे वय जास्त असल्याने भारतात जाऊ नये, असा सल्ला त्यांना दिला गेला होता; पण ते भारतात जाण्याच्या हट्टावर कायम राहिले होते. भारतातून परतल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसायला लागली होती. त्यांची तपासणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. गेल्या आठवड्यात तुतला पूर्णपणे बरे व्हायला लागले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटायला लागले. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि शनिवारी त्यांचे निधन झाले. तुतला यांचा मृतदेह बंदिस्त करून दफनविधीसाठी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर “इस्लामिक बर्रियल कौन्सिल’च्या माध्यमातून तुतला यांच्यावर दफनविधी करण्यात आले.
14 व्या शतकातील सुफी संत ख्वाजा निझामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यासाठी निझामुद्दीन प्रसिद्ध आहे. येथे आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभात सहभागी झालेल्यांचा देशभरात शोध सुरू आहे. या सर्वांना विलगीकरण केंद्रात ठेवले जाणार आहे. या धार्मिक समारंभास इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि किर्गिस्तान आदी देशातील सदस्य आणि धर्मगुरू येत असतात.