नवी दिल्ली – भारताची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, त्याच हॉटेलमध्ये मायदेशी परत जाण्यासाठी निघालेला दक्षिण आफ्रिकेचा संघही उतरला होता. कनिकाला करोना झाल्याचे स्पष्ट झाल्याचे समोर आल्याने संघाला विलगीकरण कक्षात राहावे लागले होते. मात्र, या सर्व खेळाडूंची चाचणी घेण्यात आली असून ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने सगळा तणाव दूर झाला आहे.
चीनमुळे जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूंमुळे जगात आतापर्यंत जवळपास 47 हजार लोकांना प्राण गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाचा धोका वाढल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय तीन सामन्यांची मालिका रद्द केली. धर्मशाला येथील पहिला सामना पावसाने वाया गेला होता, तर उर्वरित दोन्ही सामने रद्द करण्यात आले होते.
यावेळी लखनौवरुन दक्षिण आफ्रिका संघ कोलकातामार्गे मायदेशी रवाना झाला.
मात्र, त्यापूर्वी संघ ज्या हॉटेलमध्ये उतरला होता व तिथेच कनिका कपूरही वास्तव्यास होती. ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने मायदेशात परतलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला विलगीकरण कक्षात राहावे लागले होते. तसेच त्यांची चाचणीही नुकतीच घेण्यात आली. मात्र, या खेळाडूंचा चाचणी अहवाल शुक्रवारी मिळाला व त्यात सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ निगेटिव्ह ठरल्याने सर्व दडपण दूर झाले असून आता खेळाडू आपापल्या घरी परत जाण्यास मोकळे झाले आहेत.