#CWC19 : आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

चेस्टरलेस्ट्रीट – गोलंदाजांनी विजयाचा पाया रचल्यानंतर हशीम अमला (नाबाद 96) व कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस (नाबाद 80) यांनी शतकी भागीदारीचा कळस चढविला, त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा नऊ गडी व 76 चेंडू राखून दणदणीत पराभव केला. आफ्रिकेने लंकेला 49.3 षटकांत 203 धावांमध्ये गुंडाळले होते.

श्रीलंकेच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे सपशेल शरणागतीच स्वीकारली. त्यांचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याला सामन्याच्या पहिल्याच चेडूंवर बाद करीत कागिसो रबाडा याने श्रीलंकेच्या डावास खिंडार पाडले. कुशल परेरा व अविष्का फर्नांडो यांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 30 धावा केल्या. ही जोडी तंबूत परतल्यानंतर मधल्या फळीत कुशल मेंडिस (23), धनंजय डी सिल्व्हा (24) व थिसारा परेरा (21) यांनी प्रयत्न करुनही लंकेला अपेक्षेइतकी 250 धावांचा पल्ला गाठता आला नाही.

श्रीलंकेच्या डावात केवळ एक षटकार व 16 चौकार मारले गेले. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा याने क्विंटॉन डी कॉक (15) याला बाद करीत आफ्रिकेला धक्का दिला. तथापि अमला व ड्यु प्लेसिस यांनी 175 धावांची अखंडित भागिदारी करत संघाचा विजय दृष्टिपथात आणला.

संक्षिप्त धावफलक :

श्रीलंका 49.3 षटकांत सर्वबाद 203 (कुशल परेरा 30, अविष्का फर्नांडो 30, कुशल मेंडिस 23, धनंजय डी सिल्व्हा 24, थिसारा परेरा 21, ड्‌वेन प्रिटोरिस 3-25, ख्रिस मॉरिस 3-46, कागिसो रबाडा 2-36)

दक्षिण आफ्रिका -37.2 षटकांत 1 बाद 206 (हशीम अमला नाबाद 80, फाफ ड्यु प्लेसिस नाबाद 96, लसिथ मलिंगा 1-47)

Leave A Reply

Your email address will not be published.