#PAKvSA : फखर झमानला धावबाद केल्याने डीकॉक वादात

दक्षिण आफ्रिकेचा पाकवर 17 धावांनी विजय

जोहान्सबर्ग – पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना जसा फखर झमानच्या खेळीमुळे गाजला तेव्हढाच कॉन्टन डीकॉकने त्याला केलेल्या वादग्रस्त धावबादमुळेही गाजला. हा सामना यजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकला असला तरीही चर्चा झमानच्या बाद होण्याचीच सुरू आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 342 धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानने कडवा प्रतिकार करत 324 धावा केल्या. पाकिस्तानच्या डावात फखर झमानने 193 धावांची वादळी खेळी केली. तो 193 धावांवर असताना डीकॉकच्या हुशारीने फखर धावबाद झाला. त्यामुळे या रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानला 17 धावांनी पराभव पत्करावा लागला. फखरने गेल्या 50 वर्षातील ही मोठी कामगिरी करताना आपल्या खेळीत 155 चेंडूत 10 षटकार व 18 चौकार फटकावले.

5 जानेवारी 1971 रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फखर झमान हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. फखरच्या आधी 2011 साली ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनने बांगलादेशविरूद्ध नाबाद 185, 2005 साली बांगलादेशविरूद्ध भारताच्या महेंद्रसिंह धोनीने नाबाद 183 व 2012 साली भारताच्याच विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानच्या डावातील 49 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर फखर धावबाद झाला आणि पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 341 धावा केल्या. पाकिस्तानचा डाव 9 बाद 324 धावांवर रोखला गेला. पाकिस्तानच्या खेळीमध्ये फखर जमांचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. ज्यापद्धतीने फखर धावबाद झाला त्यावरुन आता चांगलाच वाद सुरु झाला आहे.
अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 30 पेक्षा जास्त धावांची गरज होती. या षटकतील पहिलाच चेंडू फटकावला व दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण दुसरी धाव घेताना फखरचे लक्ष क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूकडे नव्हते.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक डीकॉकने क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने चेंडू नॉन स्ट्राइकर एण्डला फेकल्याचा इशारा केला. हात वर करुन डीकॉकने चेंडू तिकडे फेक असे त्याला सुचवले. त्यामुळे फखरने आपल्या सहकारी खेळाडूकडे वळून पाहिलं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने चेंडू थेट फखरच्याच दिशेने फेकला व हा चेंडू थेट यष्ट्‌यांवर धडकला व फखर 193 धावांवर धावबाद झाला.

डीकॉकच्या वर्तनावर टीका

डीकॉकच्या या वर्तनावर आता प्रचंड टीका सुरू झाली आहे. खिलाडूवृत्ती दाखवण्याऐवजी डीकॉकने फसवणूक करत फखरला धावबाद केले. त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे; पण त्यांचा कर्णधार थेम्बा बवुमा याच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानच्या चाहत्यांनी केली आहे. अर्थात डीकॉकचे हे वर्तन आयसीसीच्या कोणत्याही नियमाचा भंग मानले जाणार नसल्याने त्याच्यावर कारवाईची कोणतीही शक्‍यता नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.