मुंबई – भारतात करोनाचा धोका जास्त वाढला तर पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा देशाबाहेर आयोजित करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्लॅन बी तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, स्पर्धेच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका व श्रीलंका हे दोन नवे पर्याय समोर आले आहेत.
यंदाच्या स्पर्धेला प्रारंभ होण्यास केवळ तीन महिने बाकी असून, जगभरात करोनाचा पुन्हा एकदा धोका वाढत आहे. गेल्या वर्षी देशात करोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन भारतातच केले. मात्र, अनेक खेळाडूंना करोना झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर काही महिन्यांनी बीसीसीआयने अमिरातीत या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले.
आता जगभरात करोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. एप्रिलपर्यंत भारतातील करोनाची परिस्थिती सुधारली नाही तर बीसीसीआय पुन्हा एकदा परदेशात या स्पर्धेचे आयोजन करू शकते. मात्र, आता पुन्हा अमिरातीत ही स्पर्धा घेण्याचा विचार नसून दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे पर्याय समोर आहेत. दक्षिण आफ्रिकेत 2009 साली आयपीएल आयोजित करण्यात आली होती.
दक्षिण आफ्रिकाच योग्य
भारत दक्षिण आफ्रिकेच्या वेळेपेक्षा 3 तास 30 मिनिटे पुढे आहे. म्हणजे दक्षिण आफ्रिकेत संध्याकाळी 4 वाजता सामना सुरू होईल तेव्हा भारतात संध्याकाळचे 7:30 वाजले असतील. त्यामुळे प्रक्षेपणाच्या वेळेवर परिणाम होणार नाही आणि तिथे सामनाही योग्य वेळेत संपेल, त्यामुळे खेळाडूंनाही विश्रांती मिळेल, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.