झेडपीत दक्षिणेचा 5054 निधी उत्तरेने पळविला

जयंत कुलकर्णी
गेल्या वर्षीचा निधी अखर्चित राहिल्याने उत्तरेला वाढीव निधीचा दावा

नगर – जिल्हा परिषदेचा निधी आमदारांनी पळविल्याच्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या. पण जिल्हा परिषदेत एका विभागाचा निधी दुसऱ्या विभागाने पळविल्याने अधिकारीच आता अवाक्‌ झाले आहेत. ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग करणे, या 5054 लेखाशीर्षखाली जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तर या दोन्ही विभागांना मागील देयके देऊन 10 कोटी 82 लाख निधी उपलब्ध झाला होता.

हा निधी दोन्ही विभागांना समप्रमाणात वाटप न करता परस्पर नऊ कोटी 17 लाख रुपये निधी उत्तर विभागाला देऊन रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा दक्षिण विभागाला सात तालुक्‍यांना एक कोटी 65 लाखांचा निधी मिळण्याची शक्‍यता आहे.

गेल्या चार वर्षांपासून 5054 चा निधी जिल्हा परिषदेत या ना त्या कारणामुळे गाजत आहे. हा जिल्हा परिषदेच्या हक्‍काचा निधी असून, त्यातून ग्रामीण भागातील रस्त्यांसह जिल्हा मार्ग नव्याने करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण पहिल्या वर्षी जिल्हा परिषदेला हा निधी न देता परस्पर तत्कालीन पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा निधी वर्ग करून जिल्हा परिषदेला ठेंगा दाखविला होता.

त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी आवाज उठविला. परंतु तोपर्यंत कामे देखील सुरू झाली होती. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 5054 च्या निधीचे आमदार व खासदार तसेच जिल्हा परिषद, असे वाटप करून काही निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य नाराज झाले.

तिसऱ्या  वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी हा निधी संपूर्ण जिल्हा परिषदेला देण्यात यावा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी 60 टक्‍के निधी जिल्हा परिषदेला देऊन उर्वरित 40 टक्‍के निधी आमदार व खासदारांनी सुचविलेल्या कामांना देण्याचे ठरविले. 40 टक्‍के निधीत 10 टक्‍के निधी हा खासदारांना देण्याचे ठरले. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून 5054 या निधीचे वाटप 60-40 नुसार करण्यात येत आहे. यावर्षी तब्बल 24 कोटींचा निधी 5054 या लेखाशीर्षाखाली उपलब्ध झाला होता.

त्यात मागील कामांची देयके तसेच आमदार व खासदारांनी सुचविलेल्या कामांना 40 टक्‍के प्रमाणे निधीचे वाटप केल्यानंतर जिल्हा परिषदेला 10 कोटी 82 निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तर या दोन्ही विभागांना या निधीचे समप्रमाणात वाटप करण्यात येते. त्यानुसार बांधकाम दक्षिणला पाच कोटी 41 लाख निधी मिळणे आवश्‍यक होते.

पण तसे न होता. तब्बल नऊ कोटी 17 लाख रुपये निधी उत्तरेकडे वळविण्यात आला. या निधीतून उत्तरेतील पदाधिकारी व सदस्यांनी सुचविलेल्या रस्त्यांच्या कामांना लगेच प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण विभागाला 5054 चा निधी तुटपुंजाच मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

एक कोटी 65 लाख निधी दक्षिणेतील सात तालुक्‍यांना मिळणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील सदस्यांना तब्बल चार कोटींच्या निधीवर पाणी सोडवे लागणार असून, त्यांच्या गटांतील रस्त्यांची कामे होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत चौकशी केली असता, गेल्यावर्षी या लेखाशीर्षाखाली दक्षिणेला 16 कोटी 97 लाख, तर उत्तरेला 11 कोटी 44 लाख रुपये निधी देण्यात आला होता. उत्तरेपेक्षा दक्षिणेला पाच कोटी 53 लाख रुपये निधी जास्त देण्यात आला होता. तो निधी अद्यापही अखर्चित आहे. तो खर्च होणे बाकी असल्याने उत्तरेकडे यंदा चार कोटींचा वाढीव निधी वळविल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या तरी दक्षिणेवर अन्याय झाल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.