सौरव गांगुली आज मंडळाची सूत्रे स्वीकारणार

पुणे: भारतीय क्रिकेटची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीसमोर राहणार आहे. आगामी दहा महिन्यांच्या त्याच्या कार्यकाळात त्याला मंडळाचे कामकाज, युवा खेळाडुंचा विकास, मानधन, स्पर्धांमध्ये वाढ तसेच देशांतर्गत स्पर्धेत महिला क्रिकेटसाठी भरीव कामगिरी करण्यासाठी गांगुली सज्ज झाला आहे.

मंडळावर नेमलेल्या लोढा समितीच्या निर्णयांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहत असतानाच एक माजी आंतरराष्ट्रीय कर्णधाराकडे सूत्रे जाणे हे सकारात्मक मानले जात आहे. लोढा समितीच्या शिफारशी डावलून काही राज्य संघटनांनी केलेले कामकाज वैध मानले जाणार का तेदेखील आता गांगुली काय निर्णय घेतो यावर अवलंबून आहे. भारतीय क्रिकेटमधील घराणेशाहीला अजूनही चाप बसलेला नाही. पूर्वीचे पदाधिकारी एन. श्रीनिवासन आणि अनुराग ठाकूर हेदेखील आपापल्या राज्यांच्या संघटनांवर नियंत्रण ठेवून आहेत, त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगादेखील मंडळाचा पदाधिकारी बनत आहे.

त्यामुळे ही घराणेशाही कधी संपणार याचे उत्तर आजही कोणाकडे नाही. क्रिकेटच्या दैनंदिन कामकाजावर देखील या लोकांचे बरेच नियंत्रण आहे त्यातच गांगुलीला भारतीय जनता पक्षाचा बंगालमधील चेहरा बनविण्याचे प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहेत, त्यातच गांगुलीने मंडळाच्या अध्यक्षपदासाठी शहा यांची भेट घेतल्यानंतरच अचानक गणिते बदलली व ब्रिजेश पटेल यांच्या जागी गांगुलीची अध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली. त्यामुळे मंडळाचा देखील चेहरा भाजपचा होत आहे हे उघड आहे, आशा स्थितीत गांगुली कसे कामकाज करतो याकडेही लक्ष राहणार आहे. पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी गांगुलीला भाजपचा चेहरा बनवण्याची चाल भाजपने रचली आहे.

संयुक्त सचिव म्हणून बंगाल क्रिकेट संघटनेच्या संघटनात्मक कार्याला गांगुलीने प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा निर्माण करणाऱ्या जगमोहन दालमिया यांच्या या कार्यक्षेत्रात 2015मध्ये तो अध्यक्ष झाला. त्याने भारतीय क्रिकेटच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या त्याचे कौतुकही झाले, आता मंडळात तो काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याबरोबरच देशातील क्रिकेटचा विकास आणि खेळाडूंची प्रगती यासाठी त्याला कटिबद्ध राहावेच लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.