मुंबई – बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही वारंवार करोना चाचणी करावी लागली आहे. गांगुलीनं गेल्या साडेचार महिन्यांत तब्बल 22 वेळा करोना चाचण्या केल्या आहेत.
गांगुली आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी दुबईला गेले होते. करोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये खेळवण्यात आली होती. सप्टेंबरपासून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गांगुली युएईमध्येच होते. यावेळी त्यांना करोना चाचण्या कराव्या लागल्या.
व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना गांगुली म्हणाले की, गेल्या साडेचार महिन्यात मी 22 वेळा करोनाच्या चाचण्या केल्य आहेत. यामध्ये एकदाही पॉझिटिव्ह आलो नाही. माझ्या संपर्कातील असणारे लोक पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मला करोना चाचण्या कराव्या लागल्या होत्या.
घरांमध्ये वृद्ध आई-बाबाही आहेत. तसेच मी दुबईलाही गेलो होतो. सुरुवातीला मी चिंतेत होतो. स्वत:साठी नाही तर समाजासाठी. कारण माझ्यामुळे कोणाला करोना होऊ नये ही भावना नेहमी मनात असायची. त्यामुळे एखाद्या करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचं समजल्यानंतर तत्काळ करोना चाचणी करत असे, असेही गांगुली म्हणाले.