कोलकाता – माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. त्यांना रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते. बुधवारी दुपारी छाती दुखण्याचा त्रास त्यांना जाणवत होता. त्यानंतर गांगुलीला कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याआधी २ जानेवारीला सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुली यांना दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जानेवारीला उपचारानंतर गांगुली यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने निदर्शनास आल्यांनंतर गांगुली यांच्यावर होणारी अॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता पुन्हा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. सरोज मोंडल यांच्यासह तीन डॉक्टरांची टीम गांगुलीवर उपचार करत आहे”, अशी माहिती ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी दिली होती.