मेजवानी सूपची…

थंडीच्या दिवसांमध्ये गरम गरम खाण्याची मजा वेगळीच असते. या दिवसांमध्ये भूक लागते. त्यामुळे सतत काही ना काही खाऊ आपल्या जवळ आपण ठेवत असतो. अशावेळी पौष्टीक आणि वेगळा पदार्थ खाण्याची मुलांची मानसिकता असते. त्यामुळे घराघरात कोणता पदार्थ करावयाचा हा प्रश्‍न पडणे सहाजिकच आहे. याच प्रश्‍नाचे उत्तर आहे आजच्या स्पेशल रेसेपीमध्ये…

बदामाचे सूप
साहित्य – रात्रभर भिजवलेले 15 बदाम, 1 कप दूध, 3 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, पाव कप बारीक चिरलेला फ्लॉवर, दीड कप पाणी, 1 टीस्पून तेल, मीठ, काळी मिरी पूड.

कृती – भिजवलेल्या बदामाची साले काढून त्याची दुधासोबत अगदी मऊसर पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट बाजूला ठेउन द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करुन, त्यात कांदा परतून घ्या. नंतर त्यात 1 कप पाणी आणि फ्लॉवर एकत्र करा. पाणी उकळून फ्लॉवर शिजवून घ्या. नंतर त्यात उर्वरीत अर्धा कप पाणी घालून मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण मिक्‍सरमधून बारीक वाटून नंतर गाळून घ्या. नंतर फ्लॉवर आणि बदामाचे मिश्रण एकत्र करुन मंद आचेवर 5 मिनिटे शिजू द्या. मीठ व मिरी पूड एकत्र करुन गरम गरम सर्व्ह करा.

व्हिटॅमिन सूप
साहित्य – भिजवून शिजवलेले चणे पाव कप, मोड आलेली मूग पाव कप, बारीक चिरलेले गाजर, लहान चौकोनी तुकडे केलेले टोफू, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून ओवा, 1 टी स्पून बटर, अर्धा टीस्पून मिरचीपूड, लिंबाचा रस, मीठ.

कृती – एका मोठ्या कढईत चणे, मोड आलेले मूग, टोफू, गाजर, ओवा, लिंबाचा रस, कोथिंबीर आदी सर्व साहित्य एकत्रित करा. त्यात 5 ते 6 कप पाणी घालून भाज्या अर्धवट शिजेर्पंत उकळवून घ्या. नंतर त्यात मीठ, मिरची पूड व बटर घालून काही वेळ उकळत ठेवा. गरम गरम सर्व्ह करा.

लेमन कॉरिएन्डर सुप
साहित्य – 1 जुडी कोथिंबीरीचे देठ, 3 ते 4 गवती चहाचे दांडे, आल्याचा छोटा तुकडा, 1 मोठा टोमॅटो, आर्ध्या लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरीपूड.

कृती – गवतीचहाचे दांडे धुवुन बत्त्याने थोडे ठेचुन घ्यावेत. आले धुवुन त्याच्या चकत्या कराव्यात. टोमॅटो बारीक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी घेऊन तापायला ठेवावे. पाणी तापत आले की त्यात कोथिंबिरीचे दांडे, आले, गवती चहा, टोमॅटो घालावे. गॅस मध्यम करुन व्यवस्थीत उकळू द्यावे. 3 कप पाणी उकळून साधारण अडीच कप होईपर्यंत उकळावे. पातेले गॅसवरुन उतरवून ते पाणी गाळून घ्यावे. गाळलेले पाणी परत एका पातेल्यात घालून गॅसवर ठेवावे. त्याच चवीप्रमाणे मीठ, साखर आणि मिरीपूड घालावी. भांडे खाली उतरवताना लिंबू पिळावे. गरम गरम प्यावे.

व्हेजिटेवल पालक सूप
साहित्य – 1 गड्डी पालक, गाजर, बीन्स, 4 बटन मशरुम, पनीर, कॉर्नफ्लॉवर, तेल, चीज, पुदिन्याची पाने.

कृती – पालकाची पाने उकळून वाटुन घ्या. एक वाटी पाणी टाकावे. गाजर, बीन्स, मशरुम, पनीर थोड्या तेलामध्ये तळून घ्यावे. यामध्ये पालक टाकून शिजवावे. मीठ घालून या भाज्या 3-5 मिनिटांपर्यंत शिजवून घ्याव्यात. वरून किसलेले चीज आणि पुदिना पानांनी सजवावे.

– श्रुती कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)