“भारतनाना माफ करा,सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांचा भाजपवर निशाणा

सोलापूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीचा परावभ करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजपा अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपाने विजय मिळवला आहे. मात्र, ही निवडणूक भाजपाने पैशाच्या जीवावर जिंकली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती या निवडणुकीत जिंकली, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. “भारतनाना माफ करा तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले”, असे ट्विट करत मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली, तर भाजपने आवताडे यांना संधी दिली. पहिल्या फेरीपासून आवताडे यांनी आघाडी घेतली होती. सुरुवातीस ही आघाडी थोड्या मतांची असल्याने ही लढत अटीतटीची होणार असे वाटले. मात्र पुढील प्रत्येक फेरीत आपली आघाडी वाढवत नेत आवताडे यांनी अखेर ३७३३ मताधिक्क्याने विजय संपादन केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.