नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याचाच आणखी एक प्रत्यय आग्र्यातही आला आहे. एक महिला आपल्या पतीला घेऊन ऑटोने एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचली होती.
तिच्या पतीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने अनेकदा स्वत:च्या तोंडाने पतीला ऑक्सीजन देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही ती पतीचा जीव वाचवू शकली नाही. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्था कोलमडत जात असल्याचे चित्र दाखवून दिले आहे.
विकास सेक्टर सातमध्ये राहणारे रवि सिंघल यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे पत्नी रेणू सिंघल नातेवाईकांसोबत रवि यांना घेऊन श्रीराम हॉस्पिटल, साकेत हॉस्पिटल आणि केजी नर्सिंग होममध्ये गेली होती. बेड उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही.
अखेर रेणू या ऑटोने आजारी पतीला एसएस मेडिकल कॉलेजमध्ये आणले . रस्त्यात त्या पुन्हा पुन्हा पतीला स्वत:च्या तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न करत होत्या. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी रवि यांना तपासून मृत घोषित केलं. रेणू यांना यावर आधी विश्वास बसला नाही. पण त्यानंतर त्यांचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते.
दरम्यान एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेल्या गोविंद प्रसाद गर्ग यांनाही दाखल करून घेण्यात आले नाही. त्यांना ताप येत होता. श्वास घेण्यासही त्रास होत होता. तर वैभव नगरच्या राजकुमार यांना पोटाची समस्या होती. त्यांनाही दाखल करून घेण्यात आले नाही. ते निराश होऊन परतले.
त्यांना सांगण्यात आले की, गंभीर रूग्णांनाच इमरजन्सीमध्ये दाखल करत आहेत. ऑक्सीजन संकटामुळे ३४ खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये गंभीर रूग्णांसाठी जीवन रक्षक उपकरणंही उपलब्द होत नाहीयेत. ३४ कोविड हॉस्पिटल्समध्ये हाय फ्लो ऑक्सीजन गॅस न मिळाल्याने ३५० पेक्षा अधिक नेजल कॅनुला, बायपेप, व्हेंटिलेटर बंद झाले आहेत. रूग्णांना थेट सिलेंडरने ऑक्सीजन दिले जात आहे.