तमिळ चित्रपट “सुराराई पट्टुरू’ ऑस्करच्या शर्यतीत

15 मार्चला ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकनाची घोषणा

नवी दिल्ली – आपल्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त व्हावा, अशी बहुतांश सिनेव्यावसायिकांची मनिषा असते. असा सर्वोच्च सन्मान म्हणून हॉलिवुडच्या ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते. प्रतीवर्षी होणाऱ्या या ऑस्कर पुरस्कारांसाठी इंग्लिशसह जगाभरातील सर्वच देशांमधील विविध भाषांमधील चित्रपट सादर होत असतात. आता भारतीय सिने उद्योगासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या “सुराराई पट्टुरू’ (परमेश्‍वराचे स्तवन करा) या चित्रपटाला ऑस्करच्या यादीत स्थान मिळाले आहे. एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे कथानक असून दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या याने “सुराराई पट्टुरू’ या सिनेमात मुख्य भूमिका निभावली आहे. सुधा कोंगारा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यासह विविध विभागात या सिनेमाने ऑस्करच्या यादीत प्रवेश केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्‌विटरवरुन ही बातमी दिली आहे.

93 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्रता यादी जाहीर नुकतीच करण्यात आली आहे. सर्व देशांमधून निवडल्या गेलेल्या 366 चित्रपटांच्या यादीत “सुराराई पट्टुरू’ या चित्रपटाने स्थान मिळवले आहे. 15 मार्चला ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकनाची घोषणा होणार आहे. 2020 च्या उन्हाळ्यात हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता.

आता या सिनेमाला मिळालेले मानांकन पाहता, भारत पुन्हा एकदा ऑस्करवर आपली नाममुद्रा कोरतो की काय याची उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.