हडपसर – हडपसर वासीयांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे यासाठी नवीन बांधण्यात येणाऱ्या हॉस्पिटलचे प्लॅन आमदार चेतन तुपे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दाखवले. त्याचप्रमाणे हे काम त्वरित चालू करावे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही आमदार तुपे यांनी यावेळी दर्शवली आहे.
मगरपट्टा चौक येथील महापालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयाची पाहाणी महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आमदार चेतन तुपे यांनी केली. यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यासह महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व हडपसर क्षेत्रीय कार्यालय अधिकारी तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की हॉस्पिटल बांधकाम दोन टप्प्यात बांधावे म्हणजे आत्ता जे हॉस्पिटल चालू आहे त्याठिकाणी कोविड रुग्णांची सोय करता येईल व मोकळ्या जागेत फेज वन हॉस्पिटलची इमारत बांधून पूर्ण झाल्यावर जुन्या जागेतील हॉस्पिटल ते स्थलांतर करता येईल व फेस 2 चे काम त्याठिकाणी करता येईल.
आमदारांच्या या प्रस्तावास सर्वांनी मान्यता देऊन हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती सर्व मंजुऱ्या देऊ असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी रुबल अग्रवाल यांनी दिला.दरम्यान आमदार चेतन तुपे यांनी त्यांच्या निधीतून 46 लाख रुपये येथे चालू करण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलसाठी देण्याचे मान्य केले त्यातून या कोविड हॉस्पिटलला लागणारे साहित्य लहान मुलांसाठी लागणारे व्हेंटिलेटर ICU साठी लागणारे साहित्य याची पण खरेदी त्वरित करण्यात येणार आहे.