केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; फेरबदलही शक्‍य? मोदी, शहांची नड्डांबरोबर बैठक

नवी दिल्ली  -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याबरोबर बैठक झाली. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. विस्ताराबरोबरच मंत्रिमंडळात फेरबदलाचीही शक्‍यता वर्तवली जात आहे.

मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित विस्तार आणि फेरबदलाच्या अटकळी बांधल्या जात आहेत. अर्थात, केंद्र सरकारच्या किंवा भाजपच्या पातळीवरून त्याबाबत कुठली माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून भाजपच्या उच्चस्तरीय गोटातील वाढलेल्या हालचाली आणि बैठकांच्या सत्रामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

देशातील करोना संकटाची हाताळणी, लसीकरणाची संथगती, इंधन दरवाढ आदी मुद्‌द्‌यांवरून मोदी सरकार चौफेर टीकेचे धनी बनले आहे. त्यामुळे सरकार आणि भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातून टीकेची धार बोथट करण्यासाठी मोदी सरकारकडून काही पाऊले उचलली जाण्याची शक्‍यता आहे. एखाद्या महत्वपूर्ण सामाजिक योजनेची घोषणा होऊ शकते, अशीही चर्चा आहे.

पुढील वर्षी उत्तरप्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठीही भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्याशिवाय, पक्षाची सत्ता असणाऱ्या उत्तरप्रदेशात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीचा दौरा करून मोदी, शहा आणि नड्डांची भेट घेतली. ती पार्श्‍वभूमीही तिन्ही नेत्यांच्या बैठकीला आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचीही मोदींकडून झाडाझडती
मोदींनी केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचीही झाडाझडती सुरू केली आहे. त्यासाठी मंत्र्यांचा गट करून ते बैठका घेत आहेत. आतापर्यंत तशाप्रकारच्या तीन बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. अजून काही दिवस तशा बैठका होणार असल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.