झी मराठी या वाहिनीवरील अल्पावधीमध्ये लोकप्रिय ठरलेली लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवीच भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकरने तिच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. नुकताच या मालिकेत जान्हवी आणि जयंत यांचा लग्नसोहळ्याचा भाग प्रेक्षकांना दाखवण्यात आला होता. आता दिव्याचा खऱ्या आयुष्यात साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आहे. दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अक्षय घरत आहे. नुकताच या दोघांचा साखपुड्याचा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमातील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये दिव्याचा साखरपुड्यातील मराठमोळा लूक पाहिला मिळत आहे. नुकतेच तिच्या मेहंदी सोहळ्याचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट देखील केल्या आहेत. व्हायरल झालेल्या दिव्या आणि अक्षय यांच्या साखरपुड्यातील फोटोत दिव्याने हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात साडीवर शोभेल असा नेकलेस, केसात गजरा असा पारंपरिक लूक परिधान केला आहे. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे.
या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. यानंतर गेल्या काही वर्षांत दिव्या ही लग्नबंधनात केव्हा अडकणार याबद्दल विचारणा केली जात होती. आता या प्रश्नाला पूर्णविराम लागला असून दिव्याच्या घरी लग्नसराईला सुरूवात झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असे नमूद केलेले आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकार हजेरी लावणार आहेत.