कॉंग्रेसमध्ये लवकरच राजकीय भूकंप

राजकीय प्रवाहासोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मागणी

सातारा  –
 आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहेत. त्यातच आता प्रवाहाबरोबर राहण्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आ. जयकुमार गोरेदेखील लवकरच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याते जिल्ह्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बोराटवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आ. जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखालील संघटनेची ताकद दाखविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

बोराटवाडीतील बैठकीला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, वंदनाताई धायगुडे, भीमराव पाटील, डॉ. सुरेश जाधव, किरण बर्गे, मानाजी घाडगे, अर्जुन काळे, विराज शिंदे, सुदाम दीक्षित, हिंदूराव चव्हाण, संपतराव माने, शुभांगी काकडे, सागर शिवदास, पोपटराव करपे, आनंदराव साबळे, भाऊसाहेब शेळके, देवानंद पाटील, काकासाहेब मोरे, विठ्ठल घाडगे, गौतम जाधव तसेच कराड, वाई, कोरेगाव, माण, खटाव, खंडाळा, सातारा, फलटण, रहिमतपूर येथील कॉंग्रेसचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील संघटनेची ताकद अनेक वेळा दिसली आहे. विधानपरिषद निवडणुकीत ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत आणि माढा लोकसभा निवडणुकीत या संघटनेने करिष्मा करुन दाखवला. पंधरा दिवसांच्या घडामोडीतून मला खासदार करायचा निर्णय बोराटवाडीतील बैठकीतच झाला होता.

आ. गोरेंच्या एका शब्दावर मुख्यमंत्र्यांनी मला लोकसभेवर जाण्याची संधी दिली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बोराटवाडीतच संघटनेची बैठक होत आहे. आ. जयकुमार गोरेंच्या लढवय्या वृत्तीचा अनुभव अनेक निवडणुकांमध्ये आला आहे. आता आपण ठरवू तेच जिल्ह्यात घडणार आहे. काही मतदारसंघातील निर्णय वेगाने घेऊन आपण कामाला लागणार आहोत. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, आमच्या संघटनेत विधानसभेला निवडून येण्यासारखे सहकारी आहेत, मात्र दुर्दैवाने आमच्या नेतृवाला संघटनेची ताकद दिसतच नाही.

आता निवडणुका आल्या तरी कॉंग्रेसचे नेते सुस्तच आहेत. गेल्या निवडणुकीत धैर्यशील कदमांचा पराभव कॉंग्रेसच्याच नेत्यांनी केला होता. कोरेगावातून किरण बर्गेंना उमेदवारी दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते. मेरीट आणि कॅलिबरला कॉंग्रेसमध्ये किंमतच नाही. कार्यकर्त्याला मोठे करणारे नेतृत्वच कॉंग्रेसमध्ये नाही. आता आम्ही दुसऱ्यांची तळी उचलणार नाही. मी आमदार होणारच आहे पण त्याच वेळी संघटनेतील सहकाऱ्यांनाही संधी मिळायला हवी. अचूक वेळेवर आम्ही टायमिंग शॉट खेळणार आहोत. राष्ट्रवादीरुपी सापाला दूध पाजायचे नाही हा आमचा अजेंडा आहे. जिल्ह्यातील कट्टर कॉंग्रेस कार्यकर्ते वेगळा विचार का करायला लागले आहेत याचे आत्मचिंतन नेतृत्वाने करायची वेळ आली आहे. जिल्ह्याला आमच्या संघटनेचा विचार करावाच लागणार आहे. आमची ताकद निर्णायक आहे. जिथे आमचा सन्मान होईल तिथेच आम्ही ठाम भूमिका घेणार आहोत.

पवारांनी पंधरा वर्षे मंत्रीपद, राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापतीपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देवूनही आता फलटणकर कटोरा घेऊन फिरत आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी फलटणमधून अपक्ष उमेदवार द्यावा. आम्हीही रणजितदादांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवार देतो. कोण किती पाण्यात आहे हे एकदा बघूच असे आव्हानही त्यांनी दिले. धैर्यशील कदम म्हणाले, आता आम्ही भावी रहाणार नाही. खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली आमची वाटचाल राहणार आहे.

आम्ही राष्ट्रवादीला मदत करणार नाही अन्‌ कॉंग्रेसमधून कुणी लढायला इच्छुक नाही. बैठकीत जिल्ह्यातील असंख्य कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त करताना आमदार गोरेंचे ठरले असले तर आमचेपण त्यांच्याबरोबरच रहायचे ठरले असल्याचे तसेच त्यांनी लोकसभेला रिस्क घेतली आता आम्ही त्यांच्यासाठी रिस्क घेणार असे सांगितले. आ गोरेंकडे जिल्हा आशेने पहातोय. राष्ट्रवादीविरोधात कुठुनही लढा आम्ही बरोबर आहोत अशी ग्वाही दिली.

पृथ्वीराज बाबांवर जीवापाड प्रेम करतो
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांवर मी जीवापाड प्रेम करतो. अगदी एकतर्फी प्रेम करतो. जिल्ह्यात त्यांचे नेतृत्व वाढावे म्हणून मी कायम राष्ट्रवादीला कायम अंगावर घेत आलो. बाबांनीही माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मोठी मदत केली असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी सर्वांची मनोगते ऐकून घेतल्यावर सांगितले.

कॉंग्रेसचे नेतृत्वच खमक्‍या नाही…!
कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या हालचालींना पक्षनेतृत्वाले कधीच बळ दिले नाही. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले नाही. कायमच गळचेपी झाली असा तक्रारींचा पाढाच अनेकांनी वाचला. कोरेगाव मतदारसंघात आम्हाला स्थानिक नेतृत्व द्या अशी मागणीच डॉ. सुरेश जाधव यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.