सोनू सूदला पंजाबच्या निवडणूक आयोगाने “स्टेट आयकॉन’म्हणून घोषित केले आहे. पंजाबच्या निवडणूक आयोगाच्या ट्विटर हॅन्ड्लवर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
“पंजाबच्या नागरिकांसाठीचा खराखुरा हिरो आता राज्याच्या निवडणूक आयोगाचा स्टेट आयकॉन देखील असणार आहे.’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सोनू सूद गेल्या सहा महिन्यांपासून त्याने केलेल्या समाजसेवेच्या कामामुळे सतत चर्चेत असतो. लॉकडाऊनच्या काळात त्याने प्रवासी मजूरांच्या प्रवासासाठी स्वतःच्या खर्चाने वाहनांची व्यवस्था केली होती.
याशिवाय त्याने शेकडो मजूरांच्या जेवणाचीही व्यव्स्था केली होती. याबद्दल त्याचे सर्वच स्तरांमधून कौतुक झाले होते. आता सोनू सूदने स्वतःचे आत्मचरित्रदेखील लिहायला घेतले आहे. त्यामध्ये तो करोनाची साथ, लॉकडाऊन आणि त्या काळात त्याला आलेले अनुभव लिहीणार आहे.
“आय ऍम नो मसिहा’ असे समर्पक शिर्षक त्याने या चरित्राला दिले आहे. आपण जे काही काम केले ते अपल्याला योग्य वाटले म्हणूनच केले. त्यामध्ये मी काहीही जगावेगळे केलेले नाही, असे त्याने म्हटले आहे.
याशिवाय आपल्या आयुष्यातील ध्येयाबद्दलही तो या चरित्रामध्ये आपली भूमिका मांडणार आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचे हे चरित्र प्रकाशित होणार आहे.