नाशिक: अभिनेते सोनू सूद आणि भाजप यांचा काहीही संबंध नाही ते आमचे कार्यकर्तेही नाहीत, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की एखादी व्यक्ती संकटकाळात लोकांना मदत करण्याचे काम करीत असेल तर त्याला लक्ष्य करण्याचे कारण नाही. पण शिवसेनेने ते काम केले आहे. हे अयोग्य आहे, असेही महाजन यांनी म्हटले आहे.
सोनू सूद याने लॉकडाऊनच्या काळात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांना अन्नपाण्याच्या मदतीसह त्यांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. त्याबद्दल त्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात असताना सूद हा कोणाचा तरी मुखवटा म्हणून काम करीत आहे, त्याच्या कामाद्वारे महाराष्ट्रातील आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव रचण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांन केला होता.
त्यामुळे हा भाजपचा डाव असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्थलांतरितांना मदत करण्यास सरकार जर कमी पडत असेल तर व्यक्तिगत पातळीवर लोकांना मदत करण्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे. चांगल्या कामाला अशी राजकीय जोड देणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.