प्रियांका, ज्योतिरादित्य यांची उपस्थिती
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत येथे गुरूवारी पक्षाची महत्वपूर्ण बैठक झाली. मात्र, त्या बैठकीपासून पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सोनियांचे पुत्र राहुल गांधी दूर राहिले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कॉंग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबरच पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पक्षाचे काही मुख्यमंत्री, सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांनीही बैठकीला हजेरी लावली. मात्र, राहुल यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला आहे. त्यापार्श्वभूमीवर, राहुल यांच्या अनुपस्थितीचे कारण कॉंग्रेस सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. विशिष्ट पदांवर असणाऱ्या नेत्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे राहुल यांना निमंत्रण दिले गेले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. बैठकीत अर्थव्यवस्थेबाबतही चर्चा घेण्याचे ठरल्याने मनमोहन यांना बोलावण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा नामुष्कीजनक पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या त्यांच्याकडे पक्षाचे कुठलेही पद नाही.
बैठकीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांमध्ये सध्या अस्वस्थ असल्याची चर्चा असणारे कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांचाही समावेश होता. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या ज्योतिरादित्य यांना प्रदेशाध्यक्ष बनवावे, अशी त्यांच्या समर्थकांची जोरदार मागणी आहे. ते पद न मिळाल्यास ज्योतिरादित्य वेगळा विचार करू शकतात, अशा चर्चांनाही उधाण आले आहे. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीसपद भुषवत असलेल्या प्रियांका गांधीही बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्या.