सोनियांना नियमित अध्यक्षा बनवावे-वीरप्पा मोईली

नेतृत्वाविषयीचा संभ्रम संपवण्यासाठी मांडली भूमिका

बंगळूर : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असा सोनिया गांधी यांचा उल्लेख होऊ नये. त्यांना नियमित अध्यक्षा बनवावे, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम.वीरप्पा मोईली यांनी केली आहे.

कॉंग्रेसच्या नेतृत्वावरून निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी मोईली यांनी संबंधित भूमिका मांडली आहे. इतर कुठली व्यवस्था नसताना आणि विशेषत: राहुल गांधी अध्यक्ष म्हणून पुन्हा सक्रिय होण्यास उत्सुक नसताना कुणीतरी जबाबदारी स्वीकारायला हवी. कॉंग्रेसची अवस्था निर्नायकी बनणे सोनियांनाही रूचणार नाही. त्यामुळे सोनियांनी नियमित अध्यक्षा बनावे, असे मोईली पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्‌द्‌यावरून संभ्रमाची स्थिती असल्याचे सूचित होत आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे 20 महिन्यांच्या कालावधीनंतर सोनियांना पुन्हा हंगामी अध्यक्षा म्हणून पक्षाची धुरा स्वीकारावी लागली. ती व्यवस्था तात्पुरती असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. मात्र, पक्षाला नवा अध्यक्ष कधी मिळणार आणि ती जबाबदारी कोण स्वीकारणार याबाबत अजूनही अनिश्‍चितता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.