नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या आधी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही देशाला उद्देशून एक व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात त्यांनी पुरेशी साधने नसतानाही जे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार आणि पोलिस करोनाशी मुुकाबला करण्यात आपले योगदान देत आहेत त्यांचे सोनियांनी कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण सर्वांनी या महामारीचा एकत्रित मुकाबला करण्यापेक्षा दुसरी देशभक्ती असू शकत नाही.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगच्या ज्या सूचना करण्यात आल्या आहेत त्याचे काटेकार पालन करण्याचे आवाहनही त्यांनी या संदेशात केले आहे. पोलीस आणि जवानांचे कौतुक करण्याबरोबरच त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे कर्मचारी लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.
या सर्वांनाच आपण सहकार्य केले पाहिजे, अन्यथा त्यांना आपले कर्तव्य बजावता येणार नाही असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. या संकटाच्या घडीला सर्व कॉंग्रेस कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत असा विश्वासही त्यांनी दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ संदेश पाच मिनीटांचा आहे.