‘त्या’ प्रश्‍नावर सोनिया गांधी म्हणाल्या…नो कमेंट्‌स

राज्यातील सत्तास्थापनेवर कॉंग्रेसने बाळगले मौन

नवी दिल्ली : महिना उलटून जात आहे परंतू, राज्यात कोणाचेही स्थिर सरकार येण्याच्या दिशेने हालचाली दिसत नाही. दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास कॉंग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक दिल्लीत पार पडणार आहे. मात्र कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर मौन बाळगले आहे. संसदेत पत्रकारांनी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील सत्तापेचावर विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. नो कमेंट्‌स इतकेच उत्तर त्यांनी दिले.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न असले तरी त्यातील अडथळे दूर झालेले नाहीत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची कॉंग्रेसची प्राथमिक तयारी होती. मात्र, कॉंग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. हा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. कॉंग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अद्यापही होकार किंवा नकार कळविलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी मंगळवारी अहमद पटेल, ए. के. ऍन्टोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. सत्ता स्थापनेचा चेंडू आता कॉंग्रेसच्या कोर्टात असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. कॉंग्रेसचे राज्यातील नेते मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी नो कमेंट्‌स असे बोलून राज्यात पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण केले असल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यात लवकरच सत्तास्थापन करण्यात येणार असल्याचा विश्‍वास आघाडीतील नेते मंडळी करत आहेत तर दुसरीकडे आता सोनिया गांधींच्या या एका शब्दाने बरच काही बोलून गेले असल्याचे म्हटले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.