नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर अत्यंत बिकट अवस्थेत असलेल्या कॉंग्रेसला अखेर अध्यक्ष मिळाला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर पक्षाने हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचीच निवड केली आहे. तसेच, कार्यकारिणीने राहुल गांधी यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामाही स्वीकारला. महाराष्ट्राचे मुकुल वासनिक आणि कर्नाटकचे मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती परंतु, बारा तासांच्या बैकीनंतर सोनिया गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत होऊ शकले नाही त्यामुळे अखेर सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले. दरम्यान, पक्षाला आता पुर्णवेळ अध्यक्ष कधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. कारण येत्या काळात झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत त्यादृष्टीने पक्षाने पावले उचलणे अपेक्षित होते परंतू, तसे न झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, आता या निवडणुकानंतरच पक्षाला अध्यक्ष मिळणार असल्याचे दिसत आहे.