नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालय व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डाॅ. अजय स्वरूप यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, 4 जानेवारीला श्वसनाच्या त्रासामुळे सोनिया यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते.
श्वसनाचा त्रास सुरु होताच डॉ. स्वरुप बसू आणि त्यांच्या टीमच्या निरीक्षणाखाली सोनिया गांधी यांना चेस्ट मेडिसिन विभागात भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सोनिया गांधी जेव्हा रुग्णालयात होत्या तेंव्हा राहुल गांधी भारत जोडो यात्रा अर्ध्यात सोडून त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते.
सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, 12 जून 2022ला सोनिया गांधी यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून सोनिया यांना प्रकृती स्वास्थ्यसंबंधी अनेकदा रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून डाॅक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.