नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी त्यांना आता पोस्ट कोवीड समस्या उद्भवल्या आहेत. त्यांच्या श्वसननलिकेत संसर्ग झाला असून दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
कॉंग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी सोशल मीडियाद्वारे सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर 12 जून रोजी त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांना फंगल इन्फेक्शन झाले, त्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून करोनानंतर होणाऱ्या पोस्ट कोवीड आजारांवरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे या पत्रकात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 2 जून रोजी सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण सौम्य लक्षणे असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.