रायबरेली – युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कन्या कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या दोघी आज संयुक्तपणे रायबरेलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. रायबेरलीच्या लोकांनी त्यांचे खासदार म्हणून पुन्हा सोनिया गांधी यांची निवड केल्याने मतदारांचे आभार मानणे हा त्यांच्या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांचा हा पहिलाच रायबरेली दौरा आहे. तथापी या दोन्ही नेत्यांकडून शेजारच्याच अमेठीलाही भेट दिली जाणार आहे किंवा कसे या विषयी मात्र काहींच माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही.
या मतदार संघातून राहुल गांधी यांना पराभव पत्करावा लागला आहे. फुरसतगंज विमानतळावर त्यांचे आज खास विमानाने आगमन झाले आणि त्यांचा मोटारींचा ताफा नंतर भुयेमाऊ येथील गेस्ट हाऊस कडे रवाना झाला. संध्याकाळी पक्ष कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला या दोन्ही नेत्या संबोधीत करणार आहेत. त्यासाठी सुमारे अडीच हजार पक्ष कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांनी भाजप उमेदवार दिनेशप्रताप सिंह यांचा 1 लाख 67 हजार 178 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने सोनिया गांधी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. त्याबद्दल सोनियांनी या दोन्ही पक्षांचे या आधीच आभार मानले आहेत.