sonakshi sinha and zaheer iqbal Wedding: बॉलिवूडमधील लग्न नेहमीच चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नासोबतच एका विशेष कायद्याचीही खूप चर्चा होत आहे. कारण वेगवेगळ्या धर्मांमुळे या दोघांनीही कोणत्याही धर्माच्या प्रथा आणि परंपरांनुसार लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा लोकांना त्यांच्या पसंतीच्या धर्म किंवा जातीच्या बाहेर कोणाशी तरी लग्न करायचे असते. अशा प्रकरणांमध्ये, विशेष विवाह कायदा, 1954 महत्त्वाची भूमिका बजावतो.
विशेष विवाह कायदा काय आहे?
विशेष विवाह कायदा, 1954 भारतामध्ये विवाह करण्याचा कायदेशीर अधिकार देतो ज्यांना त्यांचा स्वतःचा जीवनसाथी निवडायचा आहे, त्यांचा धर्म किंवा जात कोणताही असो. हा कायदा आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना साधी आणि कायदेशीर मान्यता देतो.
सोनाक्षी सिन्हाने कायदेशीर लग्न का केले?
सोनाक्षी सिन्हाने जेव्हा झहीर इक्बालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या धर्माची बरीच चर्चा झाली होती. भाजप खासदार वडील शत्रुघ्न सिन्हाही सुरुवातीला या नात्याने आणि लग्नाच्या निर्णयावर नाराज दिसले. सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार का, असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात होते. अशा परिस्थितीत सोनाक्षी आणि झहीरने मधला मार्ग निवडला आणि स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार लग्न केले. यानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जात-धर्माचा विचार न करता विवाह करण्याचा कायदा –
या कायद्यानुसार कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तीला इतर कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य आहे. या अंतर्गत लग्न करण्याची प्रक्रिया साधी आणि सोपी आहे. त्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीची गरज नाही. या कायद्यानुसार लग्न करण्यासाठी वराचे किमान वय 21 वर्षे आणि वधूचे किमान वय 18 वर्षे असावे.
लग्नाच्या एक महिना आधी नोटीस देणे आवश्यक –
विशेष विवाह कायद्यांतर्गत एखाद्या जोडप्याला विवाह करायचा असेल तर जिल्हा विवाह अधिकाऱ्यांना 30 दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. तसेच, लग्नाची नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर विवाह प्रमाणपत्र दिले जाते.
विशेष विवाह कायद्याचे महत्त्व –
हा कायदा जात आणि धर्माच्या आधारे होणारा भेदभाव कमी करण्यात मदत करतो आणि सामाजिक सौहार्दाला प्रोत्साहन देतो. या अंतर्गत व्यक्तीला आपला जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. याशिवाय या कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यालाही सर्व कायदेशीर अधिकार मिळतात.