सभापती माने; कारखान्याचा बॉयलर प्रदीपन, शेतकऱ्यांच्या खात्यावर “दिवाळी’ रक्कम जमा
रेडा – इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याच्या तेराव्या गाळप हंगामाचा बॉयलर प्रदीपन कारखान्याचे संचालक भारत बोंगाणे यांच्या हस्ते
करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने म्हणाले की, सोनाई परिवाराचे संस्थापक मार्गदर्शक दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षीचा गळीत हंगाम दि. 5 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या गुळ व साखरेच्या दरात मोठी तफावत असताना देखील शेतकऱ्यांच्या उसाला 250 रुपये प्रति टन याप्रमाणे दिवाळीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली आहे.
मागील वर्षीचा एकूण दर अडीच हजार रुपये प्रती टन शेतकऱ्यांना दिला आहे. खऱ्या अर्थाने दुष्काळी परिस्थिती असताना देखील इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याची भूमिका सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याच्या माध्यमातून संचालक मंडळाने केले आहे. शेतकऱ्याचे आर्थिक हित जपले आहे. चालू वर्षीच्या हंगामाची संपूर्ण तयारी झाली असून तोडणी व वाहतूक करार पूर्ण करण्यात आले आहेत.
सर्व यंत्रसामुग्री, देखभालीचे सर्व काम पूर्ण झाले आहे. चालू वर्षी दीड लाख मे टन उसाचे गाळप उद्दिष्ट ठेवले आहे. सोनाई कारखान्याला सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस गाळपास देऊ सहकार्य करावे, असे आवाहनही सभापती माने यांनी केले. यावेळी वसंत सोलनकर, सचिन चौधरी, शशिकांत गटकुळ, अण्णासाहेब धोत्रे, पिंटू गायकवाड तसेच मुख्य अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.