बीड – जन्मदात्या पित्यास मुलाने धारदार कोयत्याने वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येेथे घडली आहे. दारू पिऊन आईला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या रागातून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
श्रीकिसन अंबादास तागड वय ३० असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव असून आरोपी मुलाचे नाव लहु आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत श्रीकिसन यांना दारुचे व्यसन असून ते मागील काही वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेले होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर ते सतत आईला शिवीगाळ आणि मारहाण करत असतं. सोमवारी सायंकाळीही त्यांनी पत्नीशी वाद घातला. आईला होणारी शिवीगाळ आणि मारहाण पाहून आरोपी मुलगा लहू दोघांच्या भांडणात पडला. यावेळी बापलेकामध्येही भांडणं झाली. वादानंतर श्रीकिसन शेतात निघून गेले. बराच वेळ झाल्यानंतरही वडील शेतातून परत आले नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी लहूही शेतात गेला. पण शेतात गेल्यानंतर बापलेकात पुन्हा वाद झाला. यावेळी राग अनावर झाल्याने आरोपी मुलगा लहूने हातातील कोयत्यानं वडिलांवर वार केले. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. पुढिल तपास पोलिस करित आहेत.