”कधीकधी मला वाटतं, की भगतसिंह, तू जेव्हापासून आलाय, तेव्हापासून इथे”; राज्यपालांचा सांगलीच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भगतसिंह कोश्यारी ज्या दिवशीपासून राज्याचे राज्यपाल या पदावर रुजू झाले आहे. त्यावेळपासून  ते आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या वादांमुळे चर्चेत  राहिले.  त्यातच आता त्यांनी आणखी एक वक्तव्य केले आहे.  भगतसिंह कोश्यारी यांनी सांगलीत झालेल्या एका जाहीर सभेत मिश्किलपणे बोलताना केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राज्यपालांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना उत्तराखंडमधील पावसाची महाराष्ट्रात गेल्या वर्षी आणि या वर्षी देखील झालेल्या अतिवृष्टीशी तुलना केली आहे. “इथे सगळ्यांनी पुराची चर्चा केली. इतका पूर आला, एवढं पाणी भरलं वगैरे. तुम्ही केदारनाथच्या त्या घटनेविषयी ऐकलंच असेल, जेव्हा एकाच वेळी ५ हजाराहून जास्त लोक मृत्यूमुखी पडले(केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये मोठा हाहाकार उडाला होता). तुम्ही कल्पना करू शकता, की मी कोणत्या भागातून येतो”, असे राज्यपाल यावेळी मिश्किलपणे म्हणाले.

दरम्यान, यावेळी राज्यपालांनी स्वत:लाच उद्देशून एक विधान केले. “”कधीकधी मला वाटतं, की भगतसिंह, तू जेव्हापासून आलाय, तेव्हापासून इथे दुष्काळ तर पडला नाही, पण तिथे डोंगरी भागातही (उत्तराखंड) पाऊसच होता, आणि आता इथेही पाऊसच पडतोय, अतिवृष्टी होतेय. आता यासाठी काय करावं?”, अशी कोटी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.

दरम्यान, यावेळी मिश्किलपणे बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून निघून जाण्यासंदर्भात एक विधान केलं आणि त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं. “मी इथे आल्यापासून पाऊस, अतिवृष्टी व्हायला लागली. जर हे जयंतजींना वाटतंय, तर मी लवकरात लवकर इथून सोडून निघून जाईन. कारण त्यांना नुकसान झाल्याचं ते सांगतायत. असंच तर नुकसान नसेल झालं ना पाटील साहेब?” असा खोचक सवाल देखील त्यांनी केला.

पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने सक्रीय राजकारणात परतण्याचा राज्यपालांचा प्रयत्न असून त्याअनुषंगानेच उत्तराखंडचा संदर्भ आणि इथून निघून जाण्याचा उल्लेख राज्यपालांनी केला असावा, असा तर्क आता राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.