दिसामाजी काहीतरी…

दिसामाजी काहीतरी ते लिहावे…’ असे रामदास स्वामी म्हणतात. त्यामागे मोठा गहन अर्थ दडलेला आहे. वरवर पाहता ते साधे शब्द वाटत असले तरीही त्यात फार मोठा संदेश लपलेला असल्याचे मला जाणवते. काहीतरी म्हणजे काहीतरीच लिहावे असा आशय मुळीच असू शकत नाही. मला वाटते समर्थांची यामागची भूमिका अशी असू शकते ती म्हणजे लिहा, रोज लिहा पण असे काहीतरी लिहा की, ते सर्वांना समजले, आवडले, भावले पाहिजे. लिहायचे म्हणून काहीतरी लिहू नका. लिहिलेले चिरकाल टिकेल, अजरामर होईल असे लिहावे कारण त्या संदेशात समर्थ पुढे लिहितात की, ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे!’ या संपूर्ण संदेशाचा एकत्रित विचार करता लक्षात येईल की, सतत, सातत्याने वाचन करावे. वाचन केले की, त्यावर चिंतन, मनन करावे त्यामुळे एक वैचारिक बैठक तयार होते. वाचन, चिंतन, मनन आणि तयार झालेली बैठक यांच्या संगमातून असे काहीतरी लेखन हातून घडते की, एक उत्कृष्ट, सर्वांगसुंदर साहित्यकृती निर्माण होते.

एखादा विषय सुचला की, लगेच पेन घेऊन सरसर कागदावर उतरविण्याची घाई करू नये. तो विषय हृदयपटलावर जतन करुन ठेवावा. ज्याप्रमाणे आपण गच्चीवर वाळवण टाकतो आणि दुरवर बसून निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की, एखादा पक्षी हळूच येऊन एक-एक दाणा घेऊन जातो. आपल्या मनात घोळत असलेल्या विषयाचेही असेच होते. एक-एक मुद्दा आपोआप लक्षात येतो, सुचत जातो. तोही नोंद करून ठेवावा. असे करता करता एक वेळ अशी येते की, आपण प्रचंड अस्वस्थ होतो, विषय कागदावर उतरविण्यासाठी आपण उतावीळ होतो. हीच वेळ असते मनातले सारे विचार लिहून काढण्याची. एक सर्वांगसुंदर अशी कलाकृती जन्माला येते. हेच ते समर्थांना अपेक्षित ‘काहीतरी लिहित जावे’ असे साहित्य!

चिमणी आपल्या सर्वांची पाहण्यातली आहे. अगदी ‘एक घास चिऊचा…’ किंवा ‘चिऊताई, चिऊताई दार उघड…’ ही कथा ऐकत ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. ही चिऊताई स्वतःसाठी, स्वतःच्या पिलांसाठी घरटे तयार करताना किती काळजी घेते, एक-एक काडी जमवून किती सुंदर घरटे तयार करते हे आपण नेहमीच पाहिले आहे. चिमणीच्या भूमिकेनुसार आपणही एक-एक मुद्दा आठवून, जमवून त्यावर विचार, चिंतन, मनन करून मग साहित्याची निर्मिती केली तर ते साहित्य वाचकप्रिय होईल यात तीळमात्र शंका असू नये. शेवटी प्रत्येकाने नवनिर्मितीवर घेतलेली मेहनत, केलेला अभ्यास महत्त्वाचा असतो.

प्रत्येक साहित्य कृती ही त्या त्या साहित्यिकाचे अपत्य असते. निदान साहित्यिकाने तरी आपल्या नवनिर्मितीवर अपत्यासम प्रेम केले पाहिजे. तरच इतर त्यावर प्रेम करतील. एखाद्या कुटुंबात एकापेक्षा अधिक मुले असतात. एक भाऊ दुसऱ्या भावाप्रमाणे नसतो. कुटुंबात होणारे संस्कार भिन्न नसतात परंतु तरीही दोन भावांच्या स्वभावात जमीन-अस्मानचा फरक असतो. अगदी दोन टोके म्हटलं तरी चालते परंतु जन्मदात्या आईजवळ दोन भावांमध्ये मतभेद, भेदाभेद असे काही नसते. प्रत्येक साहित्यकृती ही त्या लेखकाचे अपत्य असते. त्यामुळे आई जशी दोन्ही मुलांना समसमान माया करते तद्वत लेखकाने आपल्या साहित्यकृतीवर तसेच प्रेम करावे. आई जशी आपल्या सोनुल्याला सजवते, नटवते, नानाप्रकारे शृंगारित करून बाहेर पाठवते त्याचप्रमाणे साहित्यिकाने आपल्या साहित्याला सजवावे, फुलवावे, विविध अलंकारांनी, उपमांनी शृंगारित करून मगच साहित्याच्या प्रांगणात त्या कृतीला पाठवावे. त्याचे स्वागत कसे होईल, कोण स्तुती करेल, कोण टीका करेल याकडे लक्ष देऊ नये.

कौतुक आणि टीका यातूनही आपल्या साहित्याच्या प्रगतीसाठी जे घेता येईल, जी सुधारणा करता येणे शक्‍य आहे, जी करावी असे स्वतःच्या मनाला वाटते ती सुधारणा निश्‍चित करावी पण कौतुकाने हुरळून जाऊ नये आणि टीकेमुळे नाउमेद होऊ नये. एखाद्या वेळी झालेली टीकाही सहृदयतेपोटीही होऊ शकते. लेखकाने जे काही व्यक्‍त केलेय त्यापेक्षा तो अधिक चांगल्या रीतीने व्यक्त होऊ शकला असता, का कोण जाणे पण लेखकाची तयारी, पात्रता यांना लेखक न्याय देऊ शकला नाही म्हणूनही टीका होऊ शकते. त्यासाठी सातत्याने वाचन, चिंतन, मनन आणि लेखन करत राहिले, की स्वतःलाच स्वतःचे दोष दिसतात आणि मग लेखणीला एक वेगळीच धार चढते, लेखनात एक प्रकारची परिपक्वता येते. आणि मग हे दिसामाजी काहीही नव्हे तर ‘काहीतरी’ लिहिले पाहिजे याचे मर्म इथे सापडते.

पूर्वी घरोघरी अंगण असायचे. अंगणामध्ये सुंदर, मनमोहक अशी फुलझाडे असायची. सकाळच्या रामप्रहारी या फुलझाडांवर येणाऱ्या फुलांचा गंध, सुवास मानवास ताजेतवाने करायचा, एक स्फूर्ती द्यायचा, उल्हासित, उत्साहित करायचा. समर्थांनाही असाच मंत्र द्यायचा असेल की, काहीतरी असे लिहा की, ज्याचा दरवळ सर्वदूर जावा. ते लोकाभिमुख व्हावे. लोकांना आवडणारे, मनोरंजनातून ज्ञानार्जन व्हावे, चिरकाल टिकावे असे लेखन हीच अपेक्षा रामदास स्वामी यांची असावी. म्हणून ज्यांचे हात लिहिते आहेत त्यांनी असा प्रयत्न करावा की, त्यांचे लेखन समर्थांच्या अपेक्षेनुरुप असावे…

नागेश सू. शेवाळकर

Leave A Reply

Your email address will not be published.