बारामती – सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या अंतिमदिवशी वर्ग प्रतिनिधी म्हणजेच सोसायटी मतदारवर्गातून राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम सोरटे बिनविरोध झाले आहेत. राष्ट्रवादीला नमनालाच यशाचा घडा मिळालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा समर्थकांच्या व कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत “ब’ वर्गातून नवनाथ उद्योग समुहाचे संचालक संग्राम तानाजीराव सोरटे यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी गटाकडून या प्रवर्गात एकही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. तसेच काही अपक्षांनीही आपली उमेदवारी मागे घेतल्याने सोरटे यांची बिनविरोध निवड झाली.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये “ब’ वर्गातून सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोरटे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलमधून उमेदवारी जाहीर केली होती. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी “ब’ वर्गातून दाखल झालेले सर्वच अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सोरटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपच्या सोमेश्वर परिवर्तन पॅनलचे उमेदवार जाहीर झाले असून यामध्ये मुरूम- वाल्हा गटातून प्रकाश जगताप, संपत भोसले, हनुमंत शेंडकर यांना उमेदवारी मिळाली असून गट क्रमांक एकमधून बाबुराव गडदरे, श्रीरंग साळुंखे व शंकर दडस यांना उमेदवारी दिली आहे. गट क्रमांक 3 होळ- मोरगाव गटातून विठ्ठल पिसाळ, खलील काझी, गणपत होळकर यांना तर कोऱ्हाळे बुद्रुक व सुपा गटातून दिलीप खैरे, भगवान माळशिकारे, रामदास गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. मांडकी- जवळार्जुन गटातून अजित कुमार धुमाळ, बजरंग नाळे व सुरेश कुदळे यांना उमेदवारी दिली आहे.