सोमेश्वरनगर (प्रतिनिधी)- अवघ्या जिल्ह्यात लक्ष असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाच्या निवडणूक निकालाच्या मतमोजणीला (दि.14) सकाळी 8 वाजता बारामती येथे सुरुवात झाली.
सकाळी 11 वाजेपर्यंत गट नंबर एकमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलचे 3 उमेदवार तब्बल सोळा हजार मतांच्या फरकाने निवडून आले.
मतदान मोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
एकच वादा अजितदादा, शरद पवारसाहेब जिंदाबाद, सुप्रिया सुळे झिंदाबाद, आदी घोषणा हलगीच्या ठेक्यावर देत विजयाच्या गुलालाची उधळण करीत कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने दिसत होता. आतिषबाजीने पूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
गट नंबर दोनमधील सोमेश्वर विकास पॅनलचे तीन उमेदवार हेदेखील मोठ्या मताधिक्याने निवडून आले. सायंकाळी 5.45 पर्यंत गट नंबर तीनची मतमोजणी सुरू होती. त्यामध्ये गट नंबर तीनमधील राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजय झाले. सांयकाळी गट नंबर चारमधील मतमोजणी सुरु होती.
अजित पवारांच्या आव्हानाला सभासदांकडून प्रतिसाद
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वरनगर येथे पार पडलेल्या प्रचार सांगता सभेत अजित पवार यांनी सर्व सभासदांना मोठ्या मताधिक्याची ओझे माझ्या खांद्यावरती द्या, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सभासदांनी मोठे मताधिक्य मिळवून दिले आहे. भविष्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असताना हे मताधिक्य राष्ट्रवादीचे बळ आणखी बळकट करणार आहे.