कुणाची दिवाळी अन्‌ कुणाचं “दिवाळं’!

जामखेड  – कर्जत – जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले आहे. अवघ्या दोनच दिवसांत गुरुवारी मतमोजणी होणार आहे. तसेच मतमोजणीनंतर दुसऱ्याच दिवशी दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी यंदा निवडणूकीच्या रिंगणात कोणाची दिवाळी होणार आणि कोणाचे राजकीय दिवाळं निघणार हे समोर येणार आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात या निवडणुकीत 12 उमेदवारांचे भाग्य “इव्हीएम’मध्ये बंद झाले आहे. दरवेळीच्या तुलनेत या निवडणूकीत मतदानाचा टक्का 7 ते 8 टक्क्‌यांनी वाढला आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार हे गुरुवारीच पुढे येणार आहे. 12 उमेदवार मागील पंधरा दिवसांपासून दिवस रात्र एक करून मतदारांपर्यंत पोहोचले.

मतदारसंघात 3 लाख 20 हजार 69 मतदार आहेत त्यापैकी 1 लाख 69 हजार 392 पुरुष मतदार आहेत तर 1 लाख 50 हजार 676 महिला मतदार आहेत यापैकी 2 लाख 36 हजार 796 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कर्जत-जामखेड तालुक्‍यात एकूण 73.97 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याच्या गप्पा आता रंगू लागल्या आहेत. वेगवेगळ्या सर्व्हेमधून भाजप बॅकफूटवर असेल असा अंदाज वर्तवला असला तरी त्यामुळे मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते आमचाच उमेदवार बाजी मारेल असे भाकीत करत आहेत.

विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांनी गेली पाच वर्षात मतदारसंघात मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांनी त्यांना पसंती दिली की नाही हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून ठेवली होती. 100 किमी अंतरावरून आलो आहे. तो जिंकण्यासाठीच त्यामुळे सर्व मार्गाचा वापर करत त्यांनी निवडणुकीत चुरस आणली. त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र करत त्यांनी निवडणूक जिंकण्याची तयारी केली होती. तालुक्‍यात मतदानाची टक्केवारी वाढली असून याच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र उत्साहाने मतदान झालेले पाहायला मिळाले.

या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप- शिवसेना महायुती आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. भाजपने गेल्या पाच वर्षात तालुका पोखरून काढत वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आव्हान निर्माण केले आहे. शहरात ज्या प्रकारे मतदानासाठी प्रलोभनाचा वापर करण्यात आला त्यावरून तरी विकास कामाला मतदारांनी किती पसंती दिली, व प्रलोभन म्हणून दिलेल्या पैशांचे मतांमध्ये परिवर्तन झाले की नाही हे देखील येत्या गुरुवारी समजणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांचे आता गुरुवारकडे लक्ष लागले आहे.

चर्चेच्या फैरी सुरू, कट्ट्यांवर निकालही लागले

सोमवारी सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर शहरात व गावागावातचौकांमध्ये चर्चेचे फळ जोरदार रंगले आहे. मत गणना गुरुवारी होणार असली तरी गावात, शहरात हवा कोणाची, कोण निवडून येणार, हे या कट्ट्यावर ठरलेले आहेत. आगामी दोन दिवस अशा चर्चांना आलेला ऊत कायम राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.