कोणी नॉट रिचेबल, तर कोणी देवदर्शनाला

मतदान होताच उमेदवार मंडळींचे फोनही बंद

पुणे – तब्बल तीन आठवड्यांपासून सुरू असलेली विधानसभेची धावपळ, मतदानाच्या दिवशी सलग तब्बल 17 ते 18 तास कार्यकर्ते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत घालवल्यानंतर निवडणूक रिंगणातील अनेक उमेदवार मंगळवारी नॉट रिचेबल होते. कोणी देवदर्शनासाठी शहराबाहेर, तर कोणी फोन बंद करून कुटुंबासोबत वेळ घालविल. तर कोणी देवदर्शनाचा कार्यक्रम हाती घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे आता हे उमेदवार निकालाच्या दिवशीच समोर येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि.21 सप्टेंबरला लागू झाली. त्यानंतर तिकीट मिळवण्यासाठी मुंबई तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी राज्यभर फिरणाऱ्या उमेदवारांना दि.2 आणि 3 ऑक्‍टोबरला निवडणूक तिकिटे जाहीर झाली. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून निवडणुकीची धामधुम सुरू होती.

निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून अनेकांनी या निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे विविध कार्यक्रमांना हजेरी, नागरिकांच्या गाठीभेटी, बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवाद असा धडाकाच उमेदवारांनी लावला होता. दिवसभर पदयात्रा, रॅली, सभा आणि रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत गाठी-भेटी असा उमेदवारांना दिनक्रम होता.

मात्र, सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली आणि तब्बल 16 ते 18 तास प्रचारात गुंतलेले आणि मतदारांसाठी उपलब्ध असलेले हे उमेदवार मंगळवारी मात्र दिसेनासे झाले. शहरातील अनेक उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यामधील अनेकांचे मोबाइल बंद होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.