पुणे – पुणे स्थानकमार्गे जाणाऱ्या मुंबई-केएसआर बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस या गाड्यांना येत्या काळात “एलएचबी’ कोच (लिंक हॉफमन बुश) बसविण्यात येत आहेत.
मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेसला बसविण्यात येणाऱ्या “एलएचबी’ रेकमध्ये 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी, एक भोजनयान आणि 2 जनरेटर व्हॅनचा समावेश आहे. या गाडीला एक रॅक रविवारी बसविण्यात आला आहे.
तर उद्यान एक्स्प्रेस आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेसला 1 प्रथम वातानुकूलित, 3 द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 जनरेटर व्हॅन असणार आहे. या दोन्ही गाड्यांना डिसेंबरमध्ये रॅक बसविण्यात येणार आहेत.
असे आहेत “एलएचबी’ कोच
“एलएचबी’ कोचेसची रचना (लिंक हॉफमन बुश) जर्मन कंपनीने केली आहे. याची निर्मिती भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आली आहे. हे कोचेस जास्त आरामदायक असतात. अपघात घडल्यास हे कोचेस एकमेकांवर चढत नाहीत. यामुळे अपघातामध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका नसतो. डिस्क ब्रेक असल्याने हे कोचेस अधिक सुरक्षित असतात. या कोचेसमधील सुविधा अद्ययावत असल्याने प्रवास आरामदायक होतो.