पुणे – पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक दुरुस्ती आणि देखभालीकरिता दि. 26 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या आहेत. तर काहींच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पुणे ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, पनवेल पॅसेंजर या गाड्या या कालावधीमध्ये रद्द करण्यात येणार आहेत. तर सीएसएमटी-गडाग एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात येणार आहे. तर भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दौंड-मनमाडमार्गे वळविण्यात येणार आहे. यासह या मार्गावरील काही गाड्या सीएसएमटी (मुंबई) ते पुणे या मार्गावर धावणार नाहीत. त्या गाड्या पुणे स्थानकातून सुटणार आहेत. यापैकी सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुणे स्थानकातून सुटणार आहे.
तर दि. 25 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई या मार्गावर रद्द करण्यात येणार आहेत. तर दि. 25 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत पनवेल-नांदेड-पनवेल एक्स्प्रेस तर दि. 27 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष पनवेल-नांदेड-पनवेल एक्स्प्रेस पनवेल ते पुणे मार्गावर धावणार नसून पुणे स्थानकातून धावेल.