पुणे- मागील चार दिवसांपासून शहरात करोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. याआधी नमुने तपासणीची संख्या कमी झाल्यामुळे ही बाधित संख्या कमी होते का? असा प्रश्न उपस्थित झाला होत. परंतु, मागील दोन दिवसातील नमुने तपासणी संख्या पाहता आजची बाधित संख्या 300 ते 400ने कमी झाल्याचे दिसून आले. आज, दिवसभरात 1 हजार 40 बाधित सापडले तर 1 हजार 548 बाधित करोनामुक्त झाले आहेत. बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.
शहरात दररोजच्या नमुने तपासणीची संख्या तब्बल साडेसात हजारापेक्षा अधिक होती. त्यावेळी दोन हजार ते एकविशे बाधित सापडत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ही तपासणी संख्या कमी झाल्याचे दिसून आले. आठ दिवसात तर ही संख्या पाच ते साडेपाच हजारांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे बाधित संख्या दीड हजारपर्यंत खाली आली आहे. परंतु, दोन दिवसात ही बाधित संख्या उतरत्या क्रमाने येत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील आठ दिवस ही संख्या अशीच कमी होत राहिली तर शहरातील बाधितांची संख्या कमी होतेय असे म्हणता येईल.
मृत्युचे प्रमाण वाढतेच…
शहरात बाधितांची संख्य कमी होत असल्याने काहीसा दिलास आहे. मात्र, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात 61 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील 40 जणांचा समावेश असून, अन्य 21 मृत्यू हे ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यातील आहे. शहरातील मृत्युची संख्या तब्बल 3 हजार 446 वर जावून पोहचली आहे.