मुंबईतील पावसामुळे काही एक्‍सप्रेस गाड्या रद्द

मुंबई – मुंबईत गेल्या 24 तासापासून जोरदार पाऊस बरसत असल्याने त्याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा मंगळवार सकाळपासूनच ठप्प झाली होती. त्यात मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे ही पूर्णत:ठप्प झाली असून पश्‍चिम मार्गावरील वाहतूक ही अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांनी मंगळवारी घरीच राहणे पसंत केले होते. दुसरीकडे लांब पल्ल्‌याच्या अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या. ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याचा गाड्या या नाशिक किंवा पुण्यापर्यंतच चालविण्यात येत होत्या. ज्यामुळे प्रवाशांना इथून मुंबईपर्यंतचा प्रवास हा दुसऱ्या वाहनांनी करावा लागत आहे. मुंबई आणि उपनगरात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. तर काल मुंबई-पुणे दरम्यान मालगाडीच्या अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला होता. त्यातच आज पहाटे पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्यामुळे अनेक रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचले असल्याने गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजीची मुंबई-नांदेड-मुंबई तपोवन एक्‍सप्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 1 जुलैला नागपूरहून सुटलेली नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्‍सप्रेस ही नाशिकपर्यंतच करण्यात आली होती. तसेच मुंबईहून सुटणारी ही गाडी 2 रोजी नाशिकवरुनच सुटली. याशिवाय पश्‍चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल-वलसाड ही एक्‍सप्रेस देखील रद्द करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.