बाजारात गुंतवणूक करण्यास आलेले काही नमुने आणि खरा परतावा (भाग-१)

जगात इतके भुकेले लोक आहेत की ज्यांच्या समोर देव एका भाकरीच्या रूपाशिवाय प्रगटच होऊ शकत नाही

– म. गांधी.   

भूक माणसास सर्व काही करावयास भाग पाडते, हे जरी विदारक सत्य असेल तरी जेवणाच्या बाबतीत काही लोकांचे अनेक नमुनेदेखील आपणांस पाहायला मिळतात. एखाद्या मोठ्या कार्यक्रमात, जेथील मेजवानीस खाद्यपदार्थांची रेलचेल असेल अशा ठिकाणी खरी भूक लागलेली व्यक्ती पोट भरण्यास प्राधान्य देते व स्टार्टर्सकडं दुर्लक्ष करून सरळ सरळ मेन कोर्सकडं वळून आडवा हात मारताना दिसते तर कांही लोकांची चवीचवीनं आस्वाद घेत-घेतच ब्रह्मानंदी टाळी लागते. ज्या लोकांना स्ट्रीट फूड आवडतं अशांना स्वच्छतेबाबत काहीही सोयरसुतक नसतं तर काही लोक फूड

फेस्टिवलमधील सादरीकरणानेच तृप्त होत असतात. कांही लोक स्वतःची आवड-निवड, पथ्य-पाणी विचारात न घेता बाजूची व्यक्ती एखादा पदार्थ भरभरून घेतोय म्हणून तेदेखील घेतात व दुसऱ्या दिवशी डॉक्टरचं बिल भरतातव बोटं मात्र खाल्लेल्या पदार्थांच्या नावानं मोडतात. कांही महाभाग असेही असतात ज्यांना त्या मेजवानीमधील एकाही पदार्थात खरंतर स्वारस्य नसतं व ते मनाशी पक्की खूणगाठ बांधूनच आलेले असतात की घरीच जाऊनच जेवणार, तरीही ते नुसते निरनिराळे पदार्थ चिवडत बसतात व त्यांच्या पाककृती समजून घेण्यातच त्यांना रस असतो, मग अशांनी घरात साधा चहा देखील कधी केलेला नसेल तरी बेहत्तर, आणि असे महाभाग मग घरी जाऊन नित्यनियमाप्रमाणं डाळ-भातच जेवतात. कांही नवीन लोक, जे प्रथमच अशा मोठ्या मेजवानीस आलेले असतात, म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळं नव्हे तर कधी अशा ठिकाणी यायची गरजच पडली नाही म्हणून,  ते लोक तर हमखास फसतात की सुरुवात कुठून करायची ? पदार्थांची कल्पक नावं, त्यांच्या संक्षिप्त पाककृती, त्यांचं आकर्षक सादरीकरण त्यांना अजूनच गोंधळात टाकतं आणि त्यांची भूक-तहान हरपून जाते आणि मग हे आपल्यासाठी नाहीच असं मनाला बजावत व मेजवानी दिलेल्या मेज़बानास शिव्या घालत, हात हलवत ते आपल्या घरी जातात.

बाजारात गुंतवणूक करण्यास आलेले काही नमुने आणि खरा परतावा (भाग-२)

अगदी असेच नमुने आपणांस शेअर बाजारात देखील पाहायला मिळतात. खरंच जे लोक बाजारात पैसा कमवण्याच्याच उद्देशानं आलेले असतात ते लोक तो शिताफीनं कमावतातच. कांही लोक बाजारातील प्रत्येक आवर्तनाचा आनंद घेत आपली गुंतवणूक करताना व बाहेर काढताना आढळतात. कांही लोक हे कचरा (पेनी स्टॉक्स) गोळा करताना आढळतात तर कांही लोक हे बाजारातील दिखाव्यास बळी पडतात. कांही गुंतवणूकदार स्वतःची आर्थिक कुवत, केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतून ठेवलेली उद्दिष्टं याकडं पाठ फिरवून कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणीतरी अमूक एक शेअर घेतले म्हणून भर-भरून घेतात व संयम नसल्याने नुकसानीत विकून दूषणं मात्र हमखास इतरांस अथवा बाजारास देतात. कांही लोक, शेअर बाजार म्हणजे सट्टा, शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे नुसता लॉसच, अशी गृहीतकं मनाशी करूनच ते बाजाराची पायरी फक्त चौकशीपोटी चढतात व एक दोन कंपन्यांचे एखाद दुसरे शेअर्स घेऊन शेअरहोल्डर झाल्याचं कोण समाधान पावतात व संपूर्ण पूंजी मात्र एखाद्या मुदत ठेवीत अडकवून धन्य होतात. सर्वांत कीव येते ती पुरेशी माहिती न घेता बाजारात नव्यानं येणाऱ्या गुंतवणूकदार वर्गाची. बाजारातील मोहाला व त्याहीपेक्षा जास्त तो दाखवणाऱ्या लोभस सॉफ्टवेअर्सना बळी पडून कमनशिबी ठरतात. कधीकधी असं आढळून येत की शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे तर असे नवे गडी सेमिनार्सचे चार्जेस, शेअर बाजाराच्या कोर्सची फी व हमखास परतावा देणाऱ्या चित्र-विचित्र सॉफ्टवेअर्सच्या पायी घालवताना दिसतात. या सर्वांमध्ये नांव मात्र बाजाराचं खराब होतं. तरीही, ‘बदनाम ही सही,  पर नाम तो हुवा हैं ‘ या उक्तीप्रमाणं बाजाराचं आकर्षणच असं आहे की मागील कांही वर्षांत हळूहळू,प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे असेअनेकलोक त्यात अधिकाधिकगुंतवणूक करताना आढळत आहेत. एक लक्षात ठेवलं पाहिजे की, बाजार हा प्रत्येकाला संधी देत असतो, मग त्या संधीवर चान्स पे डान्स करायचा की लालसेपोटी अशीच संधी सोडून लाभातून लोभाच्या बळी पडून हातचं घालवायचं हे देखील बाजारच वेळोवेळी शिकवीत असतो. अनेक लोक बाजारात विचित्र अपेक्षा ठेऊनच येत असतात. उदा. दररोज २% ते ५% रिटर्न्स मिळण्याच्या अपेक्षेनं. एका ठराविक राज्यातील कॉल सेंटर्स यास हातभार लावताना दिसतात. ज्याठिकाणी अमूक एक अनोळखा ॲडवायजर आपल्याला वर नमूद केलेले रिटर्न्स देण्याचं आमिष दाखवतो. ते रिटर्न म्हणजे आपण केलेल्या गुंतवणुकीमधून आपणांस परत मिळणारी आपलीच रक्कम (रिटर्न) असू शकते हे लक्षात घ्यावं. विनोदाचा भाग सोडल्यास इथं खऱ्या समजूतदार गुंतवणूकदारानं लक्षात घेतलं पाहिजे की जी अशी ॲडवायजरी कंपनी लोकांना रोजचे २% ते ५% कमावून देऊ शकतात, ते स्वतःची गुंतवणूक का करत नाहीत ? लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण, अजून काय !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)