नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून काढून घेण्याची शक्यता वर्तविली आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिले आहे.
जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.
यावेळी बी. महेश यांनी 10 रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसेच उद्योजकांकडून स्वीकारले गेले नसल्यावरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 10 रुपयांचे नाणं आणून 15 वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणे बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. 10 रुपयांची नाणी बँकांसाठी मोठे ओझे झाले आहे.
यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरूक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी 10 रुपयांचे नाणे जास्तीत जास्त वापरावे यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 मध्ये आरबीआयने 100 रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी. महेश यांनी 100 च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.