सोमय्या पुन्हा मुंबईत परत; कराड स्थानकावर पोलिसांनी उतरवले, भाजपाचा आक्रमक विरोध

कराड, कोल्हापूर, मुंबई – किरीट सोमय्या यांच्या प्रस्तावित कोल्हापूर दौऱ्यानंतर कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सोमय्या यांना महालक्ष्मी एक्‍सप्रेसमधून कराडमध्ये उतरवण्यात आले. तेथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी 100 कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. तर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

कोल्हापुरात याच कोल्हापुरी इंगा दाखवतो, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिला होता. सोमय्या यांच्याविरोधात लाखभर जणांचा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच कोल्हापुर रेल्वे स्थानकातही शेकडो कार्यकर्ते हातात कोलाहापुरी वहाणा घेऊन जमा झाले होते. त्यातच भारतीय जनता पक्षाने सोमय्या यांच्या स्वागताची तयारी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या कोल्हापुरात आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्याचा अहवाल पाठवला. त्यानुसार त्यांना कोल्हापूर जिल्हा बंदीचा आदेश गृहमंत्रालयाने दिला.

महालक्ष्मी एक्‍सप्रेसने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कोल्हापूरकडे जाण्यास सोमय्या आले. त्यावेळी त्यांना कोल्हापूर जिल्हाबंदीची कल्पना पोलिसांनी दिली आणि कोल्हापूरला न जाण्याची विनंती केली. मात्र मला कोल्हापूरच्या सीमेवर अडवता येईल, येथे नव्हे अशी भूमिका घेत सोमय्या महालक्ष्मी एक्‍सप्रेसमध्ये बसले.

कोल्हापूर स्थानकावर असलेल्या तणावाच्या परिस्थितीत त्यांना मिरज रेल्वे स्थानकावर उतरवून पोलीस ताब्यात घेतील, अशी अटकळ बांधून भाजपा कार्यकर्ते मिरज स्थानकावर जमा झाले. मात्र पोलिसांनी सातारा स्थानकावर जाऊन रेल्वेत सोमय्या यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर सोमय्या यांनी प्रशासनाशी वाद नसल्याचे सांगत कराडला उतरण्यास अनुमती दिली. त्यानंतर त्यांना कराड येथील शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले. तेथे त्यांनी काही काळ थांबल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन तसेच भाजपा कार्यकर्त्यांना भेटून सोमय्या मुंबईकडे परतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.