पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासन
वाकड : वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना जाणवणाऱ्या पाणी समस्येबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. वाकडमधील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी संबंधित बैठकीत दिले. बोअरवेल अधिग्रहण करणे किंवा महापालिकेकडून कमी दरात टॅंकर उपलब्ध करून देण्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीबाबत मात्र प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाले नाही.
महापालिका भवनात ही बैठक झाली. सह-शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, तेजस्विनी डोमसे-सवाई, सुदेश राजे या वेळी उपस्थित होते. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायट्यांना जाणवणारी पाणी समस्या मांडली. वाकडचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने दिलेली “डेडलाईन’ पाळावी. बोअरवेल, विहिरींचे अधिग्रहण करून सोसायट्यांची पाण्याची तहान भागवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. चौधरी पार्क ते अटलांटा सोसायटीपर्यंत पाणी कसे वाढविणार, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. डांगे चौकात सुरू असलेल्या ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे जलवाहिनी टाकायची, कशी याबाबत संभ्रम असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वाकडमधील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे निकम यांनी सांगितले.
सोसायट्या त्रस्त
शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा सुरू झाल्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांमधील बोअरवेलचे पाणी आटू लागले. पर्यायाने, त्यांची टॅंकरची मागणी वाढली आहे. सध्या वाकडमध्ये पाणी समस्या तीव्र आहे. येथील काही मोठ्या सोसायट्यांना तर दररोज चक्क 30 टॅंकर पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे सोसायट्या जेरीस आल्या आहेत.