पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोरेगांव पार्क, बंड गार्डन आणि ढोले पाटील रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. दि. १० जुलैपर्यंत येथील कोंडी सोडवावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी, अशी मागणी “वेक अप’ पुणे चळवळीचे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. येथील रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही आवाहन जोशी यांनी यावेळी केले.
वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी प्रयोग केले, पण ते परिणामकारक ठरत नाहीत. या संदर्भात वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्याबरोबर स्थानिक रहिवाशांची बैठक जोशी यांनी आयोजित केली.
त्यावेळी सध्या एकेरी करण्यात आलेला बंडगार्डन रोड, मंगलदास रोड आणि कोरेगाव पार्कमधून अमृतलाल मेहता मार्गे बोट क्लब रोड वर जाण्याची एकेरी व्यवस्था दोन आठवड्यांसाठी पाहणी करण्यात येईल, असे या वेळी पोलिसांनी सांगितले. बैठकीला धैर्यशील वंडेकर, समीर रुपानी, डॉ. विद्या दानवे, रोहन सुरवसे, सुरेश कांबळे यासह वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
केळकर रस्ता, भिडे पुलाचाही मुद्दा
केळकर रस्ता आणि भिडे पूल यादरम्यान होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबतही चर्चा करण्यात आली. गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस नेमावेत. बॅरिकेड्सची व्यवस्था करावी, अशी सूचना मोहन जोशी यांनी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.